
WhatsApp स्टेटस गायब,
तक्रारी मात्र कायम! पोलीस महासंचालकांना जाब कोण विचारणार?
दिनांक २२/१०/२०२६ रोजी ‘WhatsApp स्टेटस’ इंग्रजीत, तक्रारी मात्र प्रलंबित! महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना सवाल कोण विचारणार? याच शीर्षकाखाली मी सोशल मीडियावर एक लेख प्रसिद्ध केला होता. या लेखातून दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. पहिला म्हणजे, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी WhatsApp स्टेटसवर शासकीय मराठी भाषेत नाही तर इंग्रजी भाषेत आवाहन करून दोन ई-मेल आयडी उपलब्ध करून देतात. दुसरा आणि अधिक गंभीर प्रश्न म्हणजे, या ई-मेल आयडीवर पाठविण्यात येणाऱ्या गंभीर तक्रारींना ना वेळेत रीतसर प्रतिसाद मिळतो, ना त्यावर ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येते. ( https://mahacoptribune.com/english-on-whatsapp-silence-on-complaints-who-will-question-maharashtras-dgp/ )
आता या लेखाचा परिणाम म्हणा किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे WhatsApp हॅक होण्याच्या संभाव्य भीतीचा परिणाम म्हणा; कारण काहीही असो, सध्या आदरणीय पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते (IPS) यांच्या WhatsApp वरून इंग्रजीतील सूचना तर दूरच, खुद्द WhatsApp स्टेटसच गायब झाल्याचे दिसत आहे!
आदरणीय दाते साहेब, आपण धारण केलेले पद आणि त्यासोबत येणारी प्रशासकीय जबाबदारी ही जनतेप्रती उत्तरदायित्वाची आहे. नागरिकांशी सहज संपर्क साधता येतो, असे दर्शविण्यापेक्षा नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची वेळेत दखल घेणे, त्यावर निष्पक्ष व परिणामकारक कार्यवाही करणे आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदाराला देणे, हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण केवळ संपर्काची उपलब्धता नव्हे, तर तक्रारींचे प्रत्यक्ष निवारण हाच जनतेचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्याचा खरा आधार आहे.
अन्यथा, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती दर मंगळवारी ‘जनता दरबार’ आयोजित करतात; मात्र या जनता दरबारातून किती नागरिकांच्या समस्या प्रत्यक्षात सुटल्या आणि किती तक्रारींचा निपटारा झाला, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.
माझी आपणास नम्र विनंती आहे की, ई-मेल आयडी किंवा WhatsApp स्टेटसच्या माध्यमातून नागरिकांना संपर्काची उपलब्धता दर्शविण्यापेक्षा त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे कालमर्यादेत निवारण करण्यासाठी प्रभावी आणि उत्तरदायी कार्यपद्धती अंमलात आणावी. तक्रारी केवळ स्वीकारल्या जाणे पुरेसे नाही; त्यावर काय कार्यवाही झाली, याची पारदर्शक माहिती तक्रारदाराला मिळणेही तितकेच आवश्यक आहे.
शेवटी, नागरिकांना संपर्कासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही सुरुवात आहे; परंतु त्यांच्या तक्रारींचे प्रत्यक्ष निवारण करणे हीच खरी प्रशासकीय जबाबदारी आहे. यातूनच महाराष्ट्र पोलीस दलाची विश्वासार्हता आणि जनमानसातील आदर वृद्धिंगत होईल.



