
“Inauguration of Bhayandar Railway Police Station: A Small Glass Shard That Raised Questions of Accountability!” “भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन : एका काचेच्या तुकड्याने उभे केले उत्तरदायित्वाचे प्रश्न!”
एक अत्यंत “गंभीर” आणि “राष्ट्रीय महत्त्वाची” बातमी समोर आली आहे. दिनांक: ०५/०८/२०२६ रोजी भाईंदर रेल्वे पोलीस स्टेशनच्या उद्घाटन सोहळ्यात एका पत्रकाराच्या ताकाच्या ग्लासात काचेचे तुकडे आढळल्याची चर्चा आहे.
आता या घटनेची उच्चस्तरीय, बहुआयामी, वैज्ञानिक आणि आवश्यक असल्यास न्यायवैद्यकीय चौकशी व्हायलाच हवी. कारण ते काचेचे तुकडे होते, असे गृहीत धरणे म्हणजे सत्याशी अन्याय ठरेल. ते कदाचित एखाद्या हिऱ्याचे तुकडे असू शकतात! आणि ती बहुमूल्य भेट मूळतः रेल्वे पोलीस आयुक्त श्री. कलासागर साहेबांसाठी प्रेमपूर्वक राखून ठेवलेली असावी; नियतीच्या खेळामुळे ती चुकून पत्रकाराच्या ग्लासात पोहोचली असावी!
अर्थात, यात तथ्य किती आणि कल्पना किती, हे देव जाणे… किंवा कलासागर साहेब जाणोत. लोकांचे काय, लोक तर काहीही बोलत असतात!
योगायोग असा की, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरही अशीच एक रंगतदार चर्चा झळकत होती. म्हणे, ८ जुलै २०२६ रोजी वाढदिवसानिमित्त काही जीआरपी अधिकाऱ्यांनी साहेबांना भगवान व्यंकटेशाची प्रतिमा कोरलेली सोन्याची अंगठी आणि सोन्याची नाणी भेट दिली. ही केवळ सोशल मीडियावरील चर्चा आहे की वस्तुस्थिती, याचा खुलासा करण्याचे भाग्य आणि अधिकार अर्थातच संबंधित व्यक्तींनाच आहे.
असो. एवढे मात्र निश्चित की, भेटवस्तूंविषयी असलेल्या चर्चांनी आणि योगायोगांनी कलासागर साहेबांचे व्यक्तिमत्त्व अधिकच “तेजस्वी” बनवले आहे. त्यांच्या भोवती निर्माण होणाऱ्या प्रत्येक चर्चेला जणू सोन्याची किनार लाभते कधी अंगठीच्या रूपाने, कधी नाण्यांच्या रूपाने, तर कधी ताकाच्या ग्लासात चमकणाऱ्या “काचेच्या” तुकड्यांच्या रूपाने!
खरोखरच, अशी विलक्षण प्रतिभा, असा अद्वितीय योगायोग आणि अशी तेजस्वी प्रतिमा प्रत्येक अधिकाऱ्याच्या नशिबी कुठे असते?
लोक म्हणतात, “सत्य काचेसारखे असते, ते चमकतेही आणि टोचतेही.”
आता त्या काचेच्या तुकड्यांनी नेमके कोणाला टोचले, हा प्रश्न प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःलाच विचारावा.



