
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांचे WhatsApp स्टेटस इंग्रजीत; मग मराठी राजभाषेच्या शासन निर्देशांचे काय? तक्रारींच्या निर्गतीचे काय?
आदरणीय श्री. सदानंद वसंत दाते (IPS) हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे येथील “सावित्रीबाई फुले” पुणे विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. अशी उच्च शैक्षणिक पात्रता आणि राज्याच्या सर्वोच्च पोलीस पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्री. दाते यांच्या WhatsApp स्टेटसवर नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेला संदेश मात्र मराठीत नव्हे, तर चक्क इंग्रजीत आहे. तो संदेश पुढीलप्रमाणे:
“I am unable to check the WhatsApp messages on a regular basis. For official concerns, reach out through ‘dgpms.mumbai@mahapolice.gov.in‘ किंवा ‘sadanand.date@gov.in‘”

आहे ना आश्चर्याची बाब?
महाराष्ट्र शासनाकडून प्रशासकीय कामकाजात आणि जनव्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी वेळोवेळी शासन निर्णय, परिपत्रके आणि आदेश निर्गमित केले जातात. अशा निर्देशांचे पालन राज्याच्या सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांकडून, विशेषतः नागरिकांशी थेट संवाद साधणाऱ्या अधिकृत संदेशांमध्ये, होणे अपेक्षित नाही काय? मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असताना नागरिकांना उद्देशून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत सूचनेत मराठी भाषेला प्राधान्य का दिले गेले नाही, हा रास्त प्रश्न उपस्थित होतो.
मात्र, प्रश्न केवळ भाषेपुरता मर्यादित नाही; तो प्रशासकीय उत्तरदायित्वाचाही आहे.
प्रसारमाध्यमांतून या संदेशाची प्रसिद्धी झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, ही घोषणा प्रत्यक्ष नागरिकसेवेसाठी आहे की केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीपुरती मर्यादित आहे?
कारण, या संदेशात नमूद केलेल्या दोन्ही ई-मेल पत्त्यांवर नागरिकांकडून पाठविण्यात आलेल्या तक्रारींवर नियमानुसार आवश्यक कार्यवाही होत नसल्याने त्या दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याचे निदर्शनास येते. तसेच, संबंधित तक्रारी प्राप्त झाल्याची पोच, त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशील किंवा तक्रारीची सद्यःस्थिती याबाबत तक्रारदारांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याची बाब गंभीर आणि चिंताजनक आहे.
नागरिकांना तक्रारी पाठविण्यासाठी अधिकृत ई-मेल पत्ते उपलब्ध करून देणे ही स्वागतार्ह बाब आहे; परंतु त्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची वेळेत दखल घेणे, त्यांचा योग्य पाठपुरावा करणे आणि तक्रारदारांना प्रतिसाद देणे हीदेखील तितकीच महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी आहे. अन्यथा, केवळ ई-मेल पत्ते प्रसिद्ध करून नागरिकांना तक्रारी पाठविण्याचे आवाहन करण्याचा प्रत्यक्ष उपयोग काय, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
तक्रारींच्या निर्गतीसाठी ठोस कार्यवाहीची मागणी
श्री. सदानंद वसंत दाते यांच्याकडे आमची ठाम मागणी आहे की, त्यांनी नागरिकांच्या संपर्कासाठी स्वतःहून प्रसिद्ध केलेल्या ई-मेल पत्त्यावर प्राप्त झालेल्या सर्व प्रलंबित तक्रारींचा विभागनिहाय आढावा घेण्यात यावा. प्रत्येक तक्रारीची अधिकृत नोंद घेऊन तिची सद्यःस्थिती निश्चित करावी, संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक अहवाल मागवावेत आणि तक्रारीचे स्वरूप व गांभीर्य लक्षात घेऊन विहित कालमर्यादेत ठोस व परिणामकारक कार्यवाही करण्यात यावी.
तसेच, तक्रारदारांना तक्रार प्राप्त झाल्याची पोच, संदर्भ क्रमांक, कार्यवाहीसाठी जबाबदार अधिकारी आणि केलेल्या कार्यवाहीचा तपशील कळविण्याची पारदर्शक व्यवस्था निर्माण करावी. ज्या तक्रारींवर अद्याप निर्णय झालेला नाही, त्याबाबत विलंबाची कारणे स्पष्ट करून त्यांची कालबद्ध निर्गती सुनिश्चित करावी. गंभीर स्वरूपाच्या तक्रारींची नियमानुसार प्राधान्याने दखल घेऊन, आवश्यकतेनुसार संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडे त्या पाठविण्यात याव्यात आणि त्यावर झालेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा करण्यात यावा.
केवळ तक्रारी स्वीकारण्यासाठी ई-मेल पत्ते प्रसिद्ध करणे पुरेसे नाही; प्राप्त तक्रारींवर नियमानुसार ठोस कार्यवाही होणे, त्याबाबतचा लेखी प्रतिसाद संबंधित तक्रारदाराला देणे आणि प्रशासकीय पारदर्शकतेच्या दृष्टीने केलेल्या कार्यवाहीची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे जनतेसमोर मांडणेही आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी व कालबद्ध निवारण सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय निर्देश द्यावेत, ही आमची स्पष्ट मागणी आहे.
शौर्याच्या गाथांपेक्षा वर्तमानातील कामगिरी महत्त्वाची!
श्री. सदानंद वसंत दाते यांना आमची नम्र; परंतु स्पष्ट विनंती आहे की, आपल्या शौर्याच्या गाथांचे विशेषतः ‘कसाब पुराणाचे’ वारंवार स्मरण करून देण्यापेक्षा वर्तमानातील प्रशासकीय कामगिरीतून आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यावर अधिक भर द्यावा.
प्रलंबित तक्रारींची वेळेत निर्गती, नागरिकांच्या निवेदनांवर ठोस कार्यवाही, तक्रारदारांना वेळेवर प्रतिसाद, पारदर्शक प्रशासकीय कार्यपद्धती आणि अधिकृत कामकाजात मराठी भाषेचा प्रभावी वापर या बाबी प्रत्यक्ष कृतीतून दिसून येणे अधिक महत्त्वाचे आहे.
जनतेला केवळ घोषणा नकोत; जनतेला अपेक्षित आहे उत्तरदायी प्रशासन, तक्रारींवर ठोस कार्यवाही, वेळेत न्याय मिळवून देणारी कार्यपद्धती आणि केलेल्या कामाचा पारदर्शक हिशेब.
म्हणूनच, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद वसंत दाते यांनी मराठी राजभाषेच्या वापराबाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे. तसेच, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची वेळेत दखल घेऊन त्यांची विहित कालमर्यादेत निर्गती करण्यासाठी ठोस व परिणामकारक पावले उचलावीत आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित तक्रारदारांना तसेच आवश्यकतेनुसार जनतेसमोर पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी. भाषेच्या वापरात आणि तक्रार निवारणातही प्रशासकीय उत्तरदायित्व प्रत्यक्ष कृतीतून दिसून यावे.
हीच आज सामान्य नागरिकांची रास्त अपेक्षा आहे.



