
‘मुंबई सहारा न्यूज‘ या इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनलने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार, सध्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या पॉडकास्टवरून मुंबई पोलीस दलात मोठा वाद पेटल्याचे समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक निवृत्त पोलीस अधिकारी विविध पॉडकास्टमध्ये सहभागी होऊन आपल्या सेवाकाळातील अनुभव, कारवाया, एन्काउंटर्स आणि कामगिरीबरोबरच खात्यांतर्गत सुधारणांबाबत (reforms), कार्यपद्धतीवर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही टीकात्मक भाष्य करत आहेत. मात्र, या कथनांमध्ये अतिशयोक्ती केली जात असल्याबद्दल मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
पोलीस आयुक्तांच्या या भूमिकेवर पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी आता अत्यंत आक्रमक आणि खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.
निवृत्त अधिकाऱ्यांचे थेट सवाल आणि गंभीर आरोप:
मत्सरापोटी टीका:
देवेन भारती यांनी स्वतःच्या सेवाकाळात कोणतेही शौर्य गाजवले नाही, म्हणूनच त्यांना इतरांच्या कामगिरीचा मत्सर वाटत आहे. त्यांनी जर स्वतः काही ठोस कामगिरी केली असेल, तर त्यांनी आपल्या पराक्रमाची यादी जाहीर करावी. त्यांना कोणी रोखले आहे?
चरण-चुंबन करणाऱ्यांनी उपदेश देऊ नये:
ज्यांनी ‘चरण-चुंबन‘ करून किंवा जीहुजुरी करून आपली उच्च पदे मिळवली आहेत, त्यांनी इतरांना नैतिकतेचे धडे किंवा उपदेश देण्याचे टाळावे.
आस्थापना मंडळाची नोटशीट सार्वजनिक करा!
देवेन भारती यांच्यात खरोखरच धैर्य असेल, तर त्यांच्या विशेष पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्त पदावरील नियुक्तीची प्रक्रिया नेमकी कशी पार पडली, याची अधिकृत नोंद असलेली पोलीस आस्थापना मंडळाची (Police Establishment Board) संबंधित नोटशीट त्यांनी सार्वजनिक करावी. त्या नोटशीटमधून त्यांच्या नियुक्ती प्रक्रियेचा खरा इतिहास आणि त्यामागील प्रशासकीय निर्णय स्पष्ट होऊ शकतील.
निवृत्त अधिकाऱ्यांच्या या थेट आणि तिखट प्रतिक्रिये मुळे मुंबई पोलीस दलाच्या वरिष्ठ वर्तुळात आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठीच चर्चा रंगली आहे.




👍