‘डीसीपी पार्टीमागचे सत्य’ की ‘वैयक्तिक वर्तनाचा आडोसा’?  चौकशी की प्रशासकीय थट्टा?

“Is This an Inquiry… or a Silent Approval?”

“ही चौकशी नाही, तर भविष्यातील ‘पार्टी परवानगी’ आहे का?”

माननीय पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या आदेशाची (जा.क्र. २२३/२०२६, दिनांक ०८/०४/२०२६) अंमलबजावणी करताना श्रीकांत पाठक यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून दूरसंचार डेटा व इतर तांत्रिक बाबींची तातडीने पडताळणी करणे अपेक्षित होते. तथापि, घटनेच्या अचूक स्थळाची खात्री झाल्याशिवाय तांत्रिक तपशील प्राप्त होऊ शकत नाही, अशी दिशाभूल करणारी व अनावश्यक ताठर भूमिका त्यांनी स्वीकारली. या भूमिकेमुळे तपासाची व्याप्ती वाढवण्याऐवजी प्रकरण जाणीवपूर्वक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे, तसेच निष्कर्षापर्यंत न पोहोचता ते दप्तरबंद करण्याकडेच कल असल्याचे सदर चौकशीदरम्यान प्रकर्षाने जाणवते.

चौकशीदरम्यान मी श्रीकांत पाठक यांचे लक्ष महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक मुसका-२०१६/१९२५१२/का.१, दिनांक २२ मार्च २०१६ कडे वेधले. या परिपत्रकानुसार, एखादी बातमी चुकीची असल्यास प्रशासनाने तत्काळ खंडन (Rebuttal) प्रसिद्ध करणे अपेक्षित होते, जेणेकरून वस्तुस्थितीची पडताळणी करून पुढील वृत्तांकन करता आले असते. तथापि, अशी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. उलट, संबंधित आक्षेप हा अधिकाऱ्याच्या ‘वैयक्तिक वर्तनाशी’ संबंधित असल्यामुळे या परिपत्रकांतर्गत कारवाई करता येत नाही, असा युक्तिवाद पाठक यांनी मांडला. (जा.क्र.: ३१/२०२६, दिनांक: १० मार्च, २०२६)

ही भूमिका अत्यंत धक्कादायक आहे. कारण, त्यांच्या मते पोलीस अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी किंवा खाजगी समारंभात मद्यधुंद अवस्थेत बारबालांसोबत नृत्य करणे व पैशांची उधळण करणे, हे केवळ ‘वैयक्तिक कृत्य’ ठरते. अशा प्रकारची भूमिका ही बेजबाबदार वर्तनाला अप्रत्यक्ष मान्यता देणारी असून, प्रशासकीय शिस्तीला हरताळ फासणारी आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ नुसार प्रत्येक पोलीस अधिकारी हा चोवीस तास कर्तव्यावर असल्याचे मानले जाते. तसेच ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमावली’ अंतर्गत लोकसेवकांच्या आचरण व नैतिकतेबाबत स्पष्ट तरतुदी आहेत. अशा परिस्थितीत, सरकारी वाहन, चालक व ऑपरेटर यांना सोबत घेऊन खाजगी कार्यक्रमास उपस्थित राहणे, तसेच तेथे मद्यधुंद अवस्थेत नृत्य करणे व पैशांची उधळण करणे, हे वर्तन स्पष्टपणे लोकसेवकास न शोभणारे (Unbecoming of a Public Servant) ठरते.

अशा स्पष्ट नियमांच्या पार्श्वभूमीवरही, श्रीकांत पाठक यांनी या कृत्याला ‘वैयक्तिक वर्तन’ म्हणून कोणत्या निकषांवर मान्यता दिली आहे, हा कळीचा प्रश्न निर्माण होतो. अशा वर्तनामुळे जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असून, वरिष्ठांच्या वर्तनाचे अनुकरण अधिनस्थांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीवर विचारणा केली असता, पाठक यांनी समाधानकारक स्पष्टीकरण देण्याऐवजी उडवाउडवीची भूमिका घेतली, जे अत्यंत खेदजनक व चिंताजनक आहे.

प्रवीण सखाराम पाटील हे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील एक स्थानिक बांधकाम व्यावसायिक असून ‘मुक्ता डेव्हलपर्स’ या नावाने कार्यरत आहेत. दिनांक १८ मार्च २०२६ रोजी ‘मुक्ता रेसिडेन्सी’ येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ही मेजवानी प्रामुख्याने ‘डीसीपी’ व त्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरील पोलीस अधिकारी तसेच निवडक महानगरपालिका अधिकाऱ्यांपुरती मर्यादित होती.

या कार्यक्रमात डान्स बारबालांचे नृत्य, महागड्या मद्याची व्यवस्था आणि त्यांच्यावर उधळण्यासाठी नवीन कोऱ्या चलनी नोटांची सोय करण्यात आली होती. या आयोजनामागील उद्देश केवळ शक्तिप्रदर्शनापुरता मर्यादित नसून, इतर बांधकाम व्यावसायिक, पुरवठादार तसेच माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करणे हा असल्याचे दिसून येते. यावरून संबंधित व्यावसायिकाचा स्थानिक प्रशासनावर असलेला प्रभाव स्पष्ट होतो. यालाच म्हणतात ‘दबदबा’ किंवा सरळ भाषेत “भौकाल”.

कृपया नमूद करणे आवश्यक आहे की, सदर चौकशीदरम्यान मी श्रीकांत पाठक यांना ठोस पुराव्यासहित अवगत केले की श्री. दीपक देवराज हे या पार्टीस प्रत्यक्ष उपस्थित होते. खुद्द देवराज यांनीच मला याबाबत स्पष्ट कबुली दिली असून, त्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या एका किरकोळ वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पायाला गंभीर दुखापत (फ्रॅक्चर) झाली आहे. सध्या ते पायाला प्लास्टर लावून व्हीलचेअरच्या सहाय्याने कार्यालयात येत आहेत, हा त्या दुखापतीचा प्रत्यक्ष दृश्य पुरावा आहे.

देवराज यांनी माझ्याशी झालेल्या संभाषणात असेही नमूद केले की, “प्रवीण पाटील हा माझ्या लहान भावासारखा आहे,” तसेच त्या रात्री कोणाकडूनही मारहाण झाली नसून केवळ घसरून पडल्यामुळेच ही दुखापत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण संभाषणाची ध्वनिफीत (Audio Clip) मी श्रीकांत पाठक यांना ऐकवली असून, त्यावरून सदर पार्टीचे आयोजन प्रत्यक्षात झाले होते हे निर्विवादपणे सिद्ध होते. असे ठोस पुरावे समोर ठेवूनही श्रीकांत पाठक यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते, ही बाब अधिकच गंभीर आहे.

उपरोक्त तथ्यांच्या आधारे, या चौकशीचा संभाव्य निष्कर्ष काय असू शकतो याबाबत आता कोणतीही शंका उरत नाही. ‘वैयक्तिक वर्तन’ या संज्ञेची पाठक यांनी केलेली व्याख्या भविष्यासाठी अत्यंत धोकादायक पायंडा पाडणारी ठरू शकते. त्यांच्या या भूमिकेनुसार, भविष्यात एखादा पोलीस अधिकारी शासकीय साधनसामग्रीचा उघड गैरवापर करून अशा प्रकारे वागताना आढळला, तरी ते पोलीस नैतिकतेच्या कक्षेबाहेर असल्याचा चुकीचा संदेश जाईल.

अशा गंभीर गैरवर्तनाला केवळ ‘वैयक्तिक कृती’ म्हणून ग्राह्य धरणे आणि कोणतीही खात्यांतर्गत कारवाई न करणे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. ही भूमिका भविष्यात इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त व अनैतिक वर्तनाला एकप्रकारे ‘मूक संमती’ देणारी ठरू शकते, अशी रास्त भीती व्यक्त होते.

अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) या जबाबदारीच्या पदावर असूनही, अशा गंभीर प्रकरणाबाबत अनभिज्ञता दर्शवणे ही बाब अत्यंत आश्चर्यकारक आहे. पोलीस दलाच्या प्रतिमा व अस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या प्रकरणात मूकदर्शकाची भूमिका स्वीकारणे, हे अधिक चिंताजनक ठरते. माननीय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, श्री. सदानंद दाते साहेब यांना नम्र विनंती आहे की, या प्रकरणात ठाणे, नवी मुंबई व मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संभाव्य सहभाग लक्षात घेता, तसेच चौकशीच्या निष्पक्षतेबाबत निर्माण झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर, सदर प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात यावी.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *